शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

बोईसरमध्ये अवैध धंदे खुलेआम सुरू;कामगार वर्ग नशेच्या आहारी

 बोईसरमध्ये  अवैध धंदे खुलेआम सुरू;कामगार वर्ग नशेच्या आहारी

बोईसर- दि.२१

बोईसार परीसरात लॉकडाउन शिथील झाल्यानंतर अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाले असून बंदी असलेल्या नशेच्या पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

बोईसरमधील अवधनगर,धोडीपूजा,भैय्या पाडा,धनानी नगर,गणेश नगर,दांडी पाडा या परीसरातील झोपडपट्टीत तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्ग तसेच रोजंदारीवर काम करणारे नाका कामगार वर्ग हजारोंच्या संख्येने राहत आहेत.त्यामुळे या भागात गावठी दारू,गुटखा,जुगार,मटका आणि गांजा सारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत.कोरोना लॉकडाउनच्या काळात हे बेकायदेशीर धंदे चोरीछुपे सुरू होते मात्र प्रशासनाने निर्बंध हटविल्यानंतर हे अवैध धंदे पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहेत.मोठ्या प्रमाणात परप्रांतीय वस्ती असलेल्या अवधनगर-धोडीपूजा भागात खुल्लमखुल्ला गांजाची बेकायदेशीर विक्री केली जात असून यामध्ये महेश धोडी नावाचा इसम आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.या अवैध धंद्यांविरोधात पोलिस देखील कधीतरी नावाला थातूरमातूर कारवाई करून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.बोईसर परीसरात सुरू असलेल्या नशेच्या या व्यापारामुळे अनेक घरात कौटुंबिक वाद-विवाद निर्माण होऊन अनेक कुटुंबे उध्वस्त होत आहेत.यामध्ये बेकायदेशीर धंदे चालविणारे गब्बर होत असताना कारखान्यात घाम गाळून दिवसाला 300-400 रुपये कामावणारा गरीब कामगार वर्ग मात्र रोजची मजुरी या व्यसनात घालवून बरबाद होताना दिसत आहे.बोईसर पोलिसांनी या सर्व अवैध बेकायदेशीर धंद्याना चाप लावून कारवाई करण्याची मागणी नागरीकांकडून सातत्याने होत आहे.